Tuesday, 24 April 2018


शाळेतल्या उन्हाळ्याच्या सुट्टीत धम्माल केलेल्या सर्वांसाठी !

 नवीनच blog लिहायला सुरवात केलीय, पहिल्यांदाच पोस्ट करतोय...

विनोदी कथा- सिगारेट

१९८० च्या दशकातील गोष्ट आहे. तेव्हा मी आणि ढापण्या बिट्टू सातवीत वगैरे असू, जुगल आठवीत आणि आमचा आणखी एक मित्र अली अकबर सहावीत. जुगल आणि बिट्टू गुजराती भाषिक होते. अली, इराणी होता आणि मी मालवणी. इराणी, म्हणजे त्याचे कुटुंब काही वर्षापूर्वीच इराणवरून भारतात आले होते, आमची कॉमन भाषा हिंदी होती त्यामुळे आमचे सर्वांचे संवाद मोडक्या तोडक्या हिंदीतूनच चालत. अली इराणी असल्यामुळे सहावीत असूनही आमच्यापेक्षा उंच आणि तगडा होता, त्याची अभ्यासातील गती पाहता तो इराणमध्येही बऱ्याच वेळा नापास झाला असावा. बिट्टू हडकुळा, बुटका होता आणि जाड भिंगाचा चष्मा काळ्या दोरीच्या मदतीने कानावर अडकवायचा. जुगल त्या मानाने उंच आणि किडकिडीत होता. त्याच्या बापाचे कपड्याचे दुकान असल्यामुळे तो नेहमी लेटेस्ट फॅशनचे कपडे घालायचा. शिवाय आमच्यात मोठा असल्यामुळे तो बऱ्याचवेळा फुल पँटही घालायचा. एकाच बिल्डींग मध्ये राहणारे आम्ही वाढायच्या वयात एकत्रच वाढलो. या वयात मुलांना ज्या ज्या काही गोष्टींचे कुतूहल असते, ते आम्हालाही होते. मोबाईल, इंटरनेटचा शोध लागायचा होता, त्यामुळे त्या बाबतीतले आमचे सर्व ज्ञान ऐकीव माहितीवरच अवलंबून होते.
जुगल त्यातला त्यात मोठा आणि शाळेत कधी कधी मोठ्या मुलांमध्ये वावरायचा, त्यातूनही त्याचा पिंड चिकित्सकाचा आणि बडेजावाचा, त्यामुळे आम्हाला पडणाऱ्या जवळ जवळ सगळ्या प्रश्नांची थोडीशी खरी आणि बरीचशी चुकीची उत्तरे त्याच्याकडूनच आम्हाला क्षणार्धात मिळायची. आम्ही अक्षरशः अवाक होऊन जायचो. आजच्या भाषेत बोलायचे तर आमच्यासाठी तो जुगल नव्हता गुगल होता. बरे, ही उत्तरे देताना त्याचा संत-महात्मा वगैरे होत असे, ज्ञान देताना त्याची डोळे मिटून बोलायची एक जबरदस्त पद्धत होती, त्या समाधीत तो जे बोलेल ते आम्ही तिघे मंत्रमुग्ध होऊन ऐकत असू. या पंधरा वर्षाच्या मुलाला इतके ज्ञान कसे? हा प्रश्न पडायचे आमचे वय नव्हते. आमचा हा महागुरु फक्त अभ्यासात फारसा हुशार नसल्यामुळे आणि यानेही परीक्षेत अनेक वेळा गटांगळ्या खाल्ल्यामुळे, उगाचच अख्ख्या बिल्डींगचे (अर्थात यात त्याचे आईबाबाही होते) त्याच्याबद्दल फारसे चांगले मत नव्हते. शेवटी, कोणाला काय वाटावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, आणि कोणाच्या इतक्या पर्सनल गोष्टीत नाक खुपसायची आम्हाला सवयच नव्हती. त्यामुळे आमची मैत्री अभेद्य होती.

मे महिन्याचे ते दिवस होते, शाळेला सुट्टी पडली होती, वातावरण गरम होते पण सगळ्यांच्या रिझल्टचा हॉट दिवस अजून यायचा होता त्यामुळे आम्ही थंडच होतो. एके दिवशी संध्याकाळी क्रिकेट खेळून झाल्यावर तळमजल्यावरच्या वडक्यांच्या ओट्यावर आम्ही गप्पा मारत बसलो होतो. सध्याला वडके फॅमिली गावाला गेली असल्यामुळे आमचा अड्डा आम्ही तिकडेच हलवला होता. आमची आताच हरलेल्या मॅच बद्दल शोकसभा चालू होती. आज वाईटच हरलो होतो. कम्प्लीट व्हाईट वॉश. सगळ्यांचा मूड ऑफ झाला होता. अक्षरशः मान खाली घालून आम्ही शेजारच्या बिल्डींगच्या मैदानातून निघून आलो होतो. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे हे मान्य, पण टीम मधील एखाद्या खेळाडूने जर खराब कामगिरी केली तर त्याचा पूर्ण टीमच्या खेळावर विपरीत परिणाम होतो. आज काहीसे असेच झाले होते. आमच्या टीमच्या बिट्टूने आज फिल्डिंग करताना सॉलिड गटारगिरी केली होती. विरुध्द टीमच्या तोडफोड फलंदाजाचा पहिल्याच ओवरला सिंपल कॅच सोडला होता आणि मग त्याच फलंदाजाने आमच्या सगळ्या बॉलरना नंतर धु धु धुतला होता. त्यावर पुन्हा बॅटिंग करताना बिट्टूने आमचा बेस्ट फलंदाज अलीला रन आऊटसुद्धा मरवले होते आणि हे कमी की काय म्हणून पुढच्याच फुल टॉस सोप्या बॉलला स्वतः आउट झाला होता. एकंदर आजच्या पराभवाचा मुख्य शिल्पकार बिट्टू होता. आणि अली आता त्याचा फुल सत्कार करायच्या मूड मध्ये होता.

“साले... सिंपल तो पकड...ललवा….” दात ओठ खात अलीने दोन्ही पंजाने कमळ करून दाखवले.”फुल टॉस बॉल तो सिक्स मारने को रहता है, तेरा दांडी उडा?......तेरेको नही खेलने को आता तो.. मेरेको मरवाने का क्यो?...” अली ओरडून रेशनपाणी घेत होता. एकंदर आजचा पराभव त्याच्या जास्तच जिव्हारी लागला होता. बिट्टू रडायच्याच बेतात होता. परिस्थिती कठीण होत चालली होती. शेवटी संकट समयी धावून येतो तोच खरा गुरु तोच खरा देव. आणि जुगल बिट्टूच्या मदतीला देवासारखा धावून आला. त्याने अलीला थांब म्हणून पंजा दाखवला.

“अली,sss.ए अली.... होता है रे, छोड ना, आज उसका दिन नही था, देख श्रीकांतने कल मार्शल को दो फोर मारे फिर आउट हो गया, अपना अपना दिन होना चाहीये”.जुगलबाबा अलीला समजावत हळुवार म्हणाला. त्यावर अलीचे फारसे काही समाधान झाले नाही
“क्याsss ये भी” म्हणून पंजा डोक्यावर आपटून माघार घेतली.. बिट्टू, अलीचे नेहमीचे गिऱ्हाईक होता. बिट्टूला आता आपण खूप टाकाऊ वगैरे आहोत असे वाटू लागले, त्याच्या डोळ्यांचे धरण टाकोटाक भरले होते.कधी फुटेल याचा नेम नव्हता. अपमान अनेक प्रकारचे असतात पण या वयात मित्राने केलेला अपमान जरा जास्तच झोंबतो. बिट्टूचे तसेच काहीसे झाले होते. तो बॅटच्या दांड्यावर डोके ठेवून बसला होता. दुःखाचा सन्नाटा पसरला.वातावरणातील ताण हलका करण्याची गरज होती.

“क्या करते है अभी?” विषय बदलायचा म्हणून मी विचारले.
“अली, क्या करते है अभी बोल ना?” रागावलेल्या अलीला शांत करण्याची गरज होती.
“चल कूछ नया करते है...”
“क्या?” जुगलने भुवया उडवून विचारले.
त्यावर अलीचे डोळे लकाकले. तो परत मूड मध्ये आला. दोन्ही हातांनी कमरेखाली गेलेली चड्डी त्याने वर ओढली, मनगटाला नाक आणि ढुंगणाला तळवे पुसले आणि उभ्यानेच पँटचे खिसे उलटे केले आणि पुढच्या खिशातून तीन चार जिन्नस जमिनीवर ओतले. त्यात दोन चार गोट्यांनी जमिनीवर उड्या मारल्या, सुट्टे पैसे पडले, चिंचोके सांडले आणि एक पाकिटही पडले. अलीचा खिसा म्हणजे खरोखर अलीबाबाची गुहाच होती. नेहमी अशाच अतिरिक्त भारामुळे त्याची चड्डी कमरेवरून खाली आलेली असे आणि ढुंगण थोडे उघडे पडत असे. खाली आलेली चड्डी त्याला दोन्ही हातांनी सारखी वर करायला लागायची. त्याच्या या ढुंगण दाखवण्याच्या स्टाईलला आमचा अजिबात विरोध नव्हता, कारण त्याच खिशात बऱ्याचवेळा आमचे आवडते इराणी मनुकेही असत. पाकीट सोडून बाकीच्या सगळ्या गोष्टी परत पँटच्या खिशात अंतर्धान पावल्या. पाकीट त्याने अगदी अलगद उघडले आणि खडूसारखे काही पदार्थ बाहेर काढले. काहीशा कुतूहलाने मी आणि बिट्टू त्याकडे पहात होतो. 

“पाच है,.. एक एक्स्ट्रा” म्हणून आम्हा तिघांकडे बघत, अलीने पांढऱ्या रंगाच्या चॉकलेटच्या सिगारेटी एकदम स्टाईलमध्ये  बाहेर काढल्या. या सिगारेटी खऱ्या सिगारेटींसारख्या साधारण दिसतात आणि टोकावर आगीचे लालही असते. मोठ्या पोरांमधील काही पोरे खेळून झाल्यावर कोंडाळे करून सिगारेट ओढतात हे आम्हाला एव्हाना माहित होते. नाहीतरी आम्हीही आता मोठे होणारच होतो.
 “क्या है?” बिट्टूने मोठे डोळे करून दचकून विचारले

“सिगरेsssट” कपटीपणे हसून अलीने किडके दात दाखवले.
“सच्चीमुच्ची वाली है क्या?” बिट्टूने कपाळावर आठ्या टाकत विचारले.
“नही मुन्ना, झुट्टीमुट्टीवाली है”...  बिट्टूच्या डोक्यावर हात फिरवत अली प्रेमाने म्हणाला. बिट्टू अलीची पुन्हा गट्टी झाली होती. आता त्याने मला आणि बिट्टूला एकेक दिली. जुगललाही तो देऊ पहात होता पण त्याने फक्त नाही म्हणून मान हलवली, ओठांचा चंबू करून सूसsss सुस्कारा सोडला आणि डोळे मिटून तो ट्रान्समध्ये गेला. नापसंती दर्शवण्याची ही त्याची स्वतंत्र पद्धत होती. आम्हाला एव्हाना माहिती होते की थोड्या वेळाने तो बोलणार, तो पर्यंत आम्ही टाइम पास करू लागलो.          

खोटी सिगरेट म्हटली म्हणून बिट्टूची भीड चेपली. आम्ही दोघे स्टाईल मध्ये खोटे झुरके घेऊ लागलो आणि एकमेकांवर खोटा धुरही सोडू लागलो. काही क्षणातच माझा अमिताभ आणि बिट्टूचा धर्मेंद्र झाला होता. अलीसुद्धा आमच्याकडे कौतुकाने बघत विलन प्राण सारखे, ओठाच्या कडेने खोटे झुरके घेत होता. चुपून चुपून बिट्टूने थोड्या वेळातच त्याची एक टोकेरी पेन्सिल बनवली आणि ती आम्हाला “ये देख, ये देख” म्हणून दाखवून खाऊन टाकली. मी सिगारेटचा एक तुकडा तोडला आणि त्याने जमिनीवर लिहून बघितले.
“अली, अबे साले, ये सिगरेट है या चॉक?” माझ्या पुचाट जोकवर अली आणि बिट्टू दोघेही उगाचच पोट धरधरून हसले. तरीही आमचा गुरु जुगल शांतच होता.
“सिगारेट पिते है, पिते है...? या खाते है...? पियेंगे कैसे? वो क्या पानी है, पानी है? पानी है ?”.. बिट्टू पातळ जोकची शृंखला तयार करु लागला.
“सिगारेट.. फु फु फु... फुकते है” मीही साथ देऊ लागलो. आणि अली उगाचच मोठ्याने हसत बसला. त्यामुळे बिट्टूला आणखी चेवच चढला. आतापर्यंत जुगलचा यात काहीच सहभाग नव्हता, तो हसतही नव्हता किंवा बोलतही नव्हता.असाच काही वेळ गेला. बिट्टू पुढे काही बोलणार तितक्यात,,,.     

“अबे सालो, बच्चे है क्या तुम?”... आता मात्र आमच्या गुरुने ओरडून मौनव्रत तोडले. अली हसायचा थांबला. सगळीकडे सायलेंस पसरला. त्यावर मी माझी उरलेली सिगारेट कचकच खाऊन टाकली आणि काय गुरुज्ञान मिळतेय याची आतुरतेने वाट पाहू लागलो.
“अबे अली, अभी बडा हो जा...” पायावर नुकत्याच आलेल्या केसांना पिळत जुगल शांतपणे म्हणाला. जुगल आत्ता ओरडला आणि लगेच पुढच्या मिनिटाला शांत झाला, त्याची हीच कृती त्याला आमच्या गुरुस्थानाकडे नेणारी होती. पण अलीचे, जुगलच्या बोलण्यापेक्षा शारीरिक कृतीकडे जास्त लक्ष होते. आणि हे ओरडणे अलीसाठी होते म्हणून आम्ही निश्चिंत झालो.

“बच्चे साले...” जुगल पुन्हा केकाटला. असे वागणे महात्म्यानांच जमू शकते, माझी तर खात्री पटली.
ओरडणे अलीसाठी होते. पण त्यामुळे त्याचा अहंकार दुखावला गेला. एक तर तो जुगलचा सगळ्यात लाडका शिष्य होता, कारण बिट्टू फाट्या होता आणि मी त्यातल्या त्यात जरा शाणा होतो. जुगलला आंधळेपणाने फॉलो करणारा अलीच होता आणि त्या अलीनेच आज ओरडा खाल्ला. त्यामुळे तो थोडा हिरमुसला.
“बोले तो?... मेरे भी पेर पे बाल आयेंगे, तू दो साल एठथ मे है ना, और मै अभी तक सिक्स मे” अलीने  बचावात्मक प्रत्युत्तर दिले.
“अबे, घोंचू बाल का नही बात कर रहा है मे, सिगरेट का बात कर रहा है” रागावून जुगल म्हणाला. बिट्टू आणि मी अलीकडे किती अज्ञानी आहे हा? अशा भावनेने पाहू लागलो.

“बडा हो जा अली, सच्चीवाली पी नाsss ” जुगल हात लांब करून पंजाची पाचही बोटे अलीकडे दाखवत पुन्हा  शांतपणे म्हणाला... बापाने कितीही धोपटला तरी अलीला फरकच पडत नसे, पण जुगल रागावला, म्हणजे साक्षात गुरु रागावला, त्यामुळे अलीला फारच वाईट वाटले असावे. त्याचा चेहरा पुरता पडला.
“ठीक है, कूछ ना कूछ तो करता हु ” म्हणून ओट्यावरून उडी मारून तो निघून गेला. बिट्टू आणि मी एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागलो, जुगल परत समाधीत गेला. काय करायचे न सुचल्यामुळे बिट्टूने जमिनीवर पडलेल्या काटक्या गोळा करायला सुरवात केली होती. अलीने आम्हाला जास्त वेळ ताटकळत ठेवलेच नाही. नाहीतरी तो आमच्या सर्वांपेक्षा फास्टच होता. काही मिनिटांतच तो परत आला. आल्या आल्या त्याने आपले खिसे पुन्हा एकदा उलटे केले, पुन्हा एकदा खिशातून गोट्या,चिंचोके इत्यादी बाहेर पडले, मात्र यावेळी जोडीला सिगारेटची सात आठ थोटके आणि एक खरेखुरे माचीस काडीसकट होते. ते त्याने जुगल समोर टाकले.

“देख सच्चीमुच्चीवाली सिगरेट लाया हु” जुगलला उद्देशून अली म्हणाला. 
‘सच्चीवाली पी ना’ या जुगलबाबाच्या आज्ञेचे अलीने तंतोतंत पालन केले होते. त्यासाठी साधन सामग्रीही आणली होती. नो डाऊट तो जुगलचा लाडका शिष्य होता. अली कित्ती शूर आहे म्हणून मी आणि बिट्टू पुन्हा गुरूकडे पाहू लागलो. आता नक्की शाबासकी मिळणार होती. पण ती पायाने चेपलेली थोटके पाहून शांत झालेला जुगल पुन्हा खवळला.
“साले, लोगो ने पैर दियेला सिगारेट, तू हमको पिने को देगा? एक बजाऊ क्या?” म्हणून त्याने तशी अॅक्शन केली.

अलीने घाबरल्यासारखे केले. “नये के लिये तो पैसे पडेंगे ना, अपने को तो क्या, धुवा चाहीये ना?” म्हणत त्याने बिट्टूने गोळा केलेल्या काटक्यांपैकी एक पोकळ काटकी उचलली आणि तोंडात धरून सिगारेट सारखी पेटवली. आलेला थोडासा धूर त्याने तोंडातून फु केला. ती जळकी काटकी त्याने बिट्टूकडे दिली. घाबरून बिट्टू दोन पावले मागेच सरकला. आता मी ती काटकी तोंडात धरली पण धुरच आला नाही कारण तोपर्यंत ती विझली होती. आमचे हे वेडगळ चाळे बघून जुगलचं डोकंच फिरलं.        
“चल, तुम लोग को सच्चीवाली पिलाता हु” आणि बॅट बिट्टूच्या हातात देऊन आमचे अज्ञान दूर करण्यासाठी आमच्या गुरुने प्रयाण केले. आम्ही पुन्हा एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागलो. काहीतरी भन्नाट घडणार होते हे निश्चित. अलीने फेकलेली माचिस परत उचलून खिशात ठेवली. ‘वाट बघणे इतके उत्कंठावर्धक असते हे आम्हाला तेव्हाच कळले’ काही वेळातच जुगल आला. त्याने वरच्या दातात खालचा ओठ पकडला होता. विजयीवीरासारखी त्याने दोन बोटाने वर करून पांढरी, नवीन, कोरी सिगारेट “समझा क्या?” म्हणून आम्हाला दाखवली. लहान मुलाला लॉलीपॉप दाखवल्यावर कसा आनंद होतो तसा अलीला झाला. त्याने जुगलला “भाईजान” म्हणून मिठी मारली. ही अलीची युनिक स्टाईल होती, आनंद झाला की तो सरळ समोरच्याला ‘भाईजान’ म्हणून मिठी मारायचा. जुगलने अलीची प्रेमळ मिठी लगेच सोडवली कारण अली फारच घामट झाला होता.    

“कोनसा है?, ५५५ ?” उत्कंठतेने मी विचारले. खरे तर ती कुठलीही असती तरी मला किंवा अलीला काहीच फरक पडणार नव्हता. आमच्या आयुष्यातील पहिली सिगारेट,.. कल्पनेनेच आम्ही बहरलो होतो.
“ट्रिपल ५, मेंगा है. फर्स्ट टाइम है ना?...शुरुवात हमेशा गोल्ड फ्लेक से करनेका” जुगलने तर्जनी दाखवत मला नीट समजावले. मी मान डोलावली. जुगल कसा, अडलेली प्रत्येक गोष्ट नीट समजवायचा. मला तर शाळेच्या किंवा क्लासच्या सरांपेक्षा जुगलचे समजावणेच फार आवडायचे. बाकीच्या सर्व विषयात एक्स्पर्ट असला तरी जुगल अभ्यासाच्या विषयात एक्स्पर्ट नव्हता नाहीतर मी क्लास त्याच्याकडेच लावला असता. 
बिट्टू स्वतःची बॅट उचलून कल्टी मारायचा प्लान करू लागला..

“मर्द बन बिट्टू, मर्द बन” अलीने हात धरून बिट्टूला बसवले. अलीने बिट्टूच्या पौरुषत्वावरच घाला घातला. आणि असे अली बिट्टूच्या बाबतीत नेहमीच करत असे, पण त्यामुळे त्याला आम्ही सहभागी होत असलेल्या समाजाच्या दृष्टीने अनावश्यक गोष्टींमध्ये भाग घ्यायला मोटीवेशन मिळत असे.   
“मै तो सिर्फ बॅट उठा रहा था ना” बिट्टूने बाजू सावरून घेतली. आता जुगलकडून अलीने सिगारेट हातात घेतली कोंडाळे करून आम्ही ती निरखून पाहू लागलो. नवीन कोरी सिगारेट इतक्या जवळून पाहण्याचा आमच्या आयुष्यातील पहिलाच प्रसंग होता. अली आणि मी खूपच रोमांचित झालो, मी तर दाबून बघितली, पण त्यामुळे थोडा पोचा आला.
“दबा मत साले, टूट जायेंगी, लोखंड समझा क्या..?..” अली मला ओरडून समजावत म्हणाला. खरंच तुटली असती तर? म्हणून मला अपराध्यासारखे वाटू लागले.
“कूछ नही होता अली, देखने को दे उसको..” म्हणून जुगलने माझ्या खांद्यावर हात टाकला. माझा आत्मविश्वास वाढला.

“एक ही मिली? ”...अलीने तोंड वाकडे करत जुगलला विचारले. म्हणजे त्याला आणखी किती हव्या होत्या, कोण जाणे? जुगलबाबा आमच्या कोणत्याही मूर्ख प्रश्नावर ओरडत नसे, चिडत नसे, अगदी व्यवस्थित उत्तरे देत असे, त्यामुळे आणखी प्रश्न विचारायची आम्हाला प्रेरणा आणि उत्तरे द्यायची त्याला संधी मिळत असे. 
“एक सिगरेट, चारो पियेंगे, दोस्ती बढेगी” जुगल सिगारेट परत घेऊन बॅटवर उलटी ठोकत म्हणाला. या तत्वज्ञानावर मी आणि अली अतिशय खुश झालो. बिट्टू मात्र जुगलच्या कृतीचे बारकाईने निरीक्षण करत होता.

“सिगारेट उलटी क्यो ठोकी?”.... बिट्टूचे काही प्रश्न अगदी अनावश्यक असतात. जुगल चमकला. त्याला लगेच उत्तर सुचेना. त्याने असे करताना मोठ्या मुलांना पाहिले होते म्हणून तो करत होता. गुरूची अवघड परीस्थिती शिष्याने ओळखली.
“तेरेको क्या रे? आ? कूछ भी पूछता है? पहिली बार पी रहा है क्या वो?” म्हणून अलीने जुगलची बाजू घेतली. त्यामुळे जुगल खुश झाला. त्याने कौतुकमिश्रित नजरेने अलीकडे पहिले. तेवढ्यानेच अलीचे काळीज सुपाएवढे झाले. नंतर जुगलने सिगारेट आडवी धरून स्वतःच्या नाकाखालून डावीकडून उजवीकडे फिरवली. यावर अली जाम खुश झाला. सिगारेट पिणे इतके साग्रसंगीत असते याची आम्हाला कोणालाच जाणीव नव्हती. सिचुएशन सॉलिड इंटरेस्टिंग होत चालली होती. आता अलीने सिगारेट घेतली त्यानेही बॅट वर उलटी ठोकली, नाकाखालून डावीकडून उजवीकडे फिरवली आणि तो माझ्याकडे आणि अलीकडे काहीतरी पराक्रम केल्यासारखा पाहू लागला. देवळात भटजी जसा करतो तसे आपल्याला करायला लागते, त्याप्रमाणे आम्ही जुगलला फॉलो करायचो. मला अलीकडून लवकर सिगारेट घेणे क्रमप्राप्त होते, कारण बिट्टूच्या नाकाखालून जर ती डावीकडून उजवीकडे गेली असती तर तिने नखशिखांत भिजून न्युमोनिया होऊन तत्काळ दम तोडला असता. बिट्टूचे नाक म्हणजे लिकेज असलेला नळ होता. सतत टीप टीप चालू असायची, बरे ती टिपायला त्याच्याकडे रुमाल कधीही नसायचा, शक्यतो त्याच्या शर्टाची आधी उजवी आणि नंतर डावी बाही तो कार्यभार समर्थपणे सांभाळायची. आणि संध्याकाळ पर्यंत दोनही बाह्या चिंब होऊन जायच्या. ते एकच कारण होते की आम्ही डब्बा ऐसपैस खेळताना चुकून पण बिट्टूचा शर्ट घ्यायचो नाही. मी पण सिगारेट उलटी ठोकून नाकाखालून डावी-उजवी फिरवली. आता बिट्टूची बारी होती. म्हणजे सिगारेट अग्नीने नाही तर बुडून मरणार होती हे शुअर.  

बिट्टू घाबरला. ढापण काढत त्याने बाहीला नाक पुसले. त्यामुळे ते काही क्षणासाठी साफ झाले असावे.
“मै नाही हा जुगल” घाबरत बिट्टू म्हणाला
“फट्टू SSSS साला”... अली ने उट्टे काढले.
“तू सेवंथ मे, मै सिक्स मे, मै पियेगा तू डरेगा?, बिट्टू डरना छोड अभी, बडा हो जा” अली काड्या सारतच होता.
“बास आयेगा तो?”... बिट्टूला पुन्हा अनेक प्रश्न होते..
“तेरे नाक का बास लेने के लिये कोई तेरे करीब आता है क्या?..पागल...” मूर्ख अली त्याला उगाचच पेटवत होता. त्याला सिगारेटच्या भवितव्याची कल्पना आली नसावी. बिट्टूकडे आता पर्याय उरलाच नाही. पेटलेल्या बिट्टूने आता डाव्या बाहीला नाक पुसले आणि तो सिगारेट माझ्याकडून घेणार तितक्यात जुगलला सिचुएशन लक्षात आली आणि त्याने सिगारेटचा जळण्यापूर्वीचा मृत्यू थांबवला.
“जान दे, तू सिधा पी ही ले” जुगल बिट्टूला हात दाखवत म्हणाला. मी आणि सिगारेटने सुटकेचा निश्वास टाकला.      

“पर पिनेके बाद, मुह मे बास आयेगा तो?”... बिट्टू म्हणजे खरोखर प्रश्नावली होता. याचा आम्ही विचारच केला नव्हता. मी आणि अली विचारात पडलो. पण आमचा गुरु पावरफुल होता. प्रत्युत्तर म्हणून जुगलने खिशातून चार हॉल्स काढल्या. आमच्या गुरूने भक्ताचा प्रॉब्लेम आधीच फोरसी केला होता.
आपला गुरु किती महान आहे, अशा काहीशा भावनेने मी आणि अली जुगलकडे पाहू लागलो. बिट्टूकडे तुच्छतेने पहात अलीने सगळ्या हॉल्स धवलाच्या हातातून ओढल्या “चाहीये तो मेरीवाली भी तू खा. ले ले फट्टूराम.” म्हणून त्याने बिट्टूच्या हातात कोंबल्या. मर्द बन, मर्द बिट्टू...मर्द .” अली सोडतच नव्हता. बिट्टूची फुल्टू वाट लागत होती. चेहरा पुन्हा रडवेला झाला. 

“किधर पियेंगे?” माझा प्रश्न योग्य होता. कारण जागा अशी हवी होती की कोणाला कळायला नको.
“टाकी के पिछे?” अलीने शक्कल काढली. आमचा चेहरा फुलला. बिट्टू सोडून सगळे खुश झाले.
टाकीच्या मागे भिंत होती त्यामुळे एक छोटा बोळ तयार झाला होता. प्रॉब्लेम एकच होता, की ती जागा अंधारी होती. पण तो सगळ्यात मोठा अॅडवानटेजही होता, कारण त्यामुळे कोणाला काही दिसणार नव्हते. लपून बसायची ती आमची सगळ्यात फेवरेट जागा होती. फक्त आमचीच. चौघेही टाकीकडे निघालो. आसपास कोणी नाही ना याचा अंदाज घेतला. कोणीच नव्हते.

“तू और बिट्टू दोनो साईड मे खडे रहो, नजर रखो कोई आ रहा है तो.” जुगल ने प्लान सांगितला. सर्वांनी माना डोलावल्या. सिगारेट प्यायचा पहिला मान लहान आणि लाडका शिष्य असल्यामुळे अलीकडे आला. छाती पुढे काढून अलीने कामगिरीचा नम्रपणे स्वीकार केला. अंधार वाढतच होता.   

“जलाने को आता है क्या?” जुगलने त्रासिकपणे अलीला विचारले.या वेळी मात्र अलीने इमानदारीत नाही म्हणून खरे उत्तर दिले.
“ठीक है, मै जलाता हु, तू मुँह मे पकड” आणि जुगलने अलीकडे सिगारेट दिली. अली ने ती एखाद्या मौल्यवान वस्तूसारखी तळहातात धरली.
“मु मे पकड साले”... जुगल ओरडल्याने अलीने दोन बोटांनी पकडून सिगारेट तोंडात धरली. अंधार गच्च झाला होता. दिसत काही नव्हते.  
“माचीस?”... अलीने खिशातून लगेच माचीस काढून दिले. मगाचची माचीस जागच्या जागी ठेवल्यामुळे लगेच मिळाली होती. मला अलीचा अभिमान वाटू लागला.
“इधर मूडके सिदा खडा रे”..तोंडात सिगारेट धरून इकडे तिकडे पाहणाऱ्या अलीला जुगलने खडसावले. त्यावर अलीने गोल फिरत अंदाज घेत जुगलच्या दिशेने मान पुढे करून उभा राहिला. 

जुगलचा पहिला प्रयत्न वाया गेला कारण हवा आली. दुसऱ्या प्रयत्नात आडोसा करून काडी पूर्ण पेटवून त्याने सिगारेट पेटवली, पण ती व्यवस्थित जळत नव्हती.
“खींssच,.. खींssच ना बराबरसे इराणी” जुगलने दम दिला. अली फु फु प्रयत्न करत होता, पण सिगारेट बरोबर पेटतच नव्हती.
“डुप्लीकेट है क्या?” मी दबक्या आवाजात विचारले.

त्यावर “तू नजर रख बराबरसे” म्हणून जुगलने बिट्टू आणि मला दोघांना दम दिला. कारण बिट्टूसुद्धा सारखा आत बाहेर पहात होता. 
जुगलने अलीकडून ती जळकी सिगारेट घेतली आणि तोंडात घातली, फुकण्याचा प्रयत्न केला आणि समोर थुंकला,सिगारेट फेकून दिली आणि अलीच्या फाडकन एक मुस्कटात भडकावली.

“मारता कायको बे?” गाल चोळत अली ओरडला.
“तेरे बाप ने कभी उलटी सिगरेट पी थी? फिल्टर मुह मे पकडने का रहता है, मालुम नही.. तो पुछ ना, शानपत्ती क्यो करने का?” जुगल भडकला. सिगारेटला फिल्टर नावाचा अवयव असतो आणि तो तोंडात पकडायचा असतो, इतपत आमच्या ज्ञानात आता भर पडली होती. बरे झाले पहिला प्रयोग अलीवरच चालू होता. कारण त्याला मार खायची सवय होती.  दुःखाची गोष्ट इतकीच की नवीन सिगारेट फुकट गेली. आता काय करायचे? अलीचा चेहरा अपराधी आणि माझा रडवेला झाला. बिट्टूला हायसे वाटत होते.
“साला तू हमेशा घोटाला करता है”.. आमचा गुरु चिडला होता.
“सॉरी, सॉरी, सॉरी, ..अंधेरे मे दिखाच नै” अली ने बिनशर्त माफी मागितली.
“और एक ला ना प्लीज, प्लीज, प्लीज ” म्हणून रिक्वेस्ट केली. अली परत मिठी मारेल म्हणून जुगल धास्तावला.

“तुम लोगो का ना लायकी नही है, सच्चीवाली पिनेका, मेरा पैसा वेस्ट हुवा तेरे वजह से”
“अभी चाहिये तो मे देता हु” म्हणून अली ने खिशातून पैसे काढून जुगलला दिले
“रख साले,”.. अलीचा पैसे धरलेला हात दाबत म्हणाला. जुगल मैत्रीत अव्वल होता. त्यावर त्याने पट्टशिष्य अलीचे लाख अपराध पोटात घातले असते. 
जुगल पुन्हा निघाला, मी आणि अली खुश झालो, बिट्टू परत टेन्शन मध्ये आला. जा.. जा.. ये.. ये.. नको म्हणून आम्ही तिथेच थांबलो.
जुगल थोड्याच वेळात आला. अलीने जुगलला पुन्हा मैत्रीच्या नावाखाली मिठी मारली. “ठीक है, ठीक है” म्हणत जुगलने अलीची प्रेमळ मिठी सोडवली. टाकीमागे आम्ही गेलो. आता मी आणि अली सुरक्षा रक्षक आणि बिट्टूच्या तोंडात सिगारेट दिली गेली. जुगलने नीट बघून बिट्टूच्या तोंडात ठेवली ”ऐसे डाल” म्हणून गायडंस दिला. जुगलने काडी ओढली, पुन्हा पहिली काडी वाया गेली. अपशकून घडतच होता. पण आता माघार नव्हती. बिट्टूने घाबरत सिगारेट तोंडात धरली. तितक्यात आवाज आला, “चूप चूप चूप ...” मी खूण केली, जुगल काडी पेटवायचा थांबला आम्ही सगळे अंदाज घेऊ लागलो. आमचा शत्रू वॉचमन कदम पाणी सोडायला आला होता. आम्ही लपून खाली बसलो. तितक्यात बिट्टूला खोकल्याची ढास लागली, तरी बरे प्रसंगावधान राखून अली आणि मी त्याचे तोंड गच्च धरून ठेवले. म्हणून सगळे वाचलो. या बिल्डींगच्या चुगलीखोर वॉचमनचे मुख्य काम आम्हा मुलांकडे लक्ष ठेवणे, त्याची माहिती पालकांपर्यंत पोचवणे हेच होते. त्यामुळे मी आणि अलीने बऱ्याच वेळा घरच्यांचा मारही खाल्ला होता. त्यासाठी लवकरच जुगल पोरे घेऊन येऊन त्याला ठोकणार होता. पण ती नंतरची गोष्ट होती.    

लवकरच कदम गेला. आम्ही पुन्हा उभे राहिलो. अलीने बिट्टूचे थोबाड शक्ती लावून अजून दाबून ठेवले होते आणि बिट्टू हात सोडवायचा प्रयत्न करत होता. शेवटी तो अलीच्या हाताला चावला.

“काटता कायको बे, कुत्ते ” किंचाळत हात झाडत अली ओरडला. पण बिट्टू नुसता थुंकत होता.      
“चल सिगारेट निकाल वापस” जुगलने थू थू करणाऱ्या बिट्टूला आज्ञा केली. बिट्टूने अलीकडे बोट दाखवले.
“मेरे पास नही है, साला, मरायगा एक दिन, कभीभी खासता है, अच्छा हुंवा मैने तेरा मु दबाके रखा.”
“वो छोड, सिगारेट निकालो ” जुगल गुरकावला.
“गिर गयी क्या?”
“-“
“नही, मै खा गया, डर गया था ” रडत रडत बिट्टू म्हणाला
“क्या?...अबे साले, सिगारेट को चिंगम समझा क्या” अली बिट्टूला डोक्यावर झापड मारत म्हणाला. पण बिट्टू काही ऐकायच्या मनस्थितीत नव्हता तो थू थू करत थुंकत ओकत होता. जुगल वैतागून निघून गेला.दुसरी सिगारेट घालवल्याबद्दल मला आणि अलीला बिट्टूचा प्रचंड राग आला होता. पण बिट्टू सगळ्या भावनांच्या पलीकडे जाऊन अजूनही थुंकतच होता. शेवटी आम्हालाही दया आली. कठीण परिस्थितीत शेवटी मित्रच कामाला येतात. बिट्टूने आमच्या प्लानची वाट लावली असली तरी आम्ही त्याला अशा परिस्थितीत एकटा सोडणार नव्हतो. झाले गेले सगळे विसरून मी आणि अलीने टाकीच्या नळावर बिट्टूला चूळ भरायला आणि थोबाड धुवायला पूर्ण मदत केली. सिगारेट न पिता बिट्टूच्या तोंडाला भयानक वास येत होता.

“बहोत बास, आ रहा है क्या?” थोड्या वेळाने माणसात आल्यावर रडत बिट्टूने विचारले. मी तोंडाजवळ जाऊन वास घेतला. प्रचंड वास येत होता. मी मानेनेच हो सांगितले. सिगारेट खाल्ल्यावर जर इतका वास येतो तर प्यायल्यावर किती येत असेल? मी विचार करू लागलो.. बिट्टू खूप टेन्शन मध्ये आला. दोन्ही बाह्याना आलटून पालटून नाक पुसून ओलीचिंब करून आता तो शर्टाच्या खालच्या बाजूवर घसरला आणि ती पण भिजवून टाकली. खरे तर बिट्टूने शर्ट टॉवेलच्याच कपड्याचे शिवणे योग्य होते. त्याचा रडका चेहरा बघून अलीला त्याची दया आली.

“एक काम कर, सब हॉल्स तू खा, म्हणून चारही गोळ्या रॅपर काढून त्याने एकाच वेळी त्याच्या तोंडात कोंबल्या. बिट्टूने त्या कडम कडम चावल्या, गोळ्या संपल्या नंतर पुन्हा चूळ भरली. मी वास घेतला, आता कोलगेट सारखा वास येत होता. धोका टळला होता. तितक्यात बिट्टूच्या आईची हाक आली आणि आपली बॅट घेऊन बिट्टू निघाला.
“मा को कूछ बता मत साले” अलीने बिट्टूला दम दिला. हा दम देणे गरजेचे होते, कारण बिट्टू विलक्षण मातृभक्त होता. घडलेल्या सगळ्या गोष्टी तो घाबरून घरी जशाच्या तशा सांगायचा. पण ही घटना आमच्या मातांना कळली असती, तर आमची खैर नव्हती. बिट्टूने बहुदा घरी काही सांगितले नसावे असे मला वाटते, कारण या गोष्टीसाठी पुढच्या सहा महिन्यात तरी मला घरच्यांनी हात नव्हता लावला.

अर्थात, पुढच्या प्लान मधून आम्ही बिट्टूला कटाप केले. त्यासाठी धूर्त अलीने जुगलशी रात्रीच संधान साधले. मिठी मारून माफीही मागितली असावी. बिट्टूला आणणार नाही या शर्तीवर तो पुन्हा तयार झाला. आता आम्हाला कोणीही थांबवू शकणार नव्हते.  
पुन्हा प्लान ठरला. आम्ही तिघांनी दुसऱ्या दिवशी २ वाजता गच्चीत भेटायचे ठरवले. दुपारी तिथे कोणीच नसते. एकत्र जमून आम्ही निघालो, पण जाताना मांजर आडवी गेली, ही निळ्या डोळ्यांची गोरी मांजर म्हणजे फातिमा, अलीची तिसरीतील धाकटी बहिण आमच्या मागे मागे येऊ लागली. जगात धाकट्या भावंडांचे मोठ्या भावंडांवर अजिबात प्रेम नसले, तरी त्यांना ते काय करतात याची मोठी उत्कंठा असते, त्यांच्याबरोबर नेहमी जायचे असते. तशी तिलाही होती. अली इराणी भाषेत तिच्याशी काहीतरी बोलला, बहुदा घरी जा म्हणून सांगत असावा, पण ती मानेने जोरात नाही म्हणाली. आणि पुन्हा मागे येऊ लागली. अली थांबला आणि त्याने तिला मागे ढकलले. त्यावर धावत येऊन तिने अलीचा पायच पकडला आणि सोबत यायचा हट्ट करू लागली. वेळ फार जात होता. अली पण तिच्याशी ओरडून बोलत होता, पाय सोडवण्याचा प्रयत्न करत होता पण ती ऐकतच नव्हती. मग अलीने तिच्या पाठीत जोरदार धपाटा घातला आणि इराणी भाषेत किंचाळला. घातलेला विळखा सोडून तिने रडून भोकाड पसरले. तिला तशीच रडत ठेवून आम्ही जिन्यावरून पळतच गच्ची गाठली.

“मारा कायको बे?” जुगलने अलीला विचारले
“सुनेगीच नही, नही तो” मारामारी बहुदा इराणी लोकांच्यात ठासून भरलेली असावी.  
आता काहीच प्रॉब्लेम नव्हता. गच्चीला आतून कडी नव्हती. काहीतरी जड सामान दरवाज्याच्या मागे ठेवणे गरजेचे होते. नाहीतर फातिमा कधीही आली असती. आम्ही आजूबाजूला बघितले ठेवण्यासाखे काहीच दिसत नव्हते. तिसऱ्या माळ्यावरच्या मारवाड्याच्या फक्त दोन चार कुंड्या होत्या. शक्तिमान अलीने जोर लावून ढकलत एक कुंडी दरवाजामागे ठेवली. कुंडीसकट दरवाजा ढकलणे फातिमाला शक्य नव्हते.आता आम्ही सेफ होतो.

यावेळी जुगल सिगारेट आणि माचिस दोन्ही घेऊन आला होता. आता गच्चीच्या टाकीमागे आम्ही तिघे बसलो.आधी जुगल, मग मी, नंतर दरवाजा जवळ अली. जुगलने सराईतपणे सिगारेट शिलगावली आणि माझ्याकडे पास केली. छोटासा झुरका घेऊन मी ती अलीकडे सोपवली.

“इन नही किया तू बराबरसे, और कात्री मे नही देनेका, दोस्ती तुटती है” जुगल ने सिगारेट प्यायचे नियम सांगितले. मी निमुटपणे दोन बोटात पकडून ती अलीकडे सोपवली, अलीने एकदम मोठा झुरका घेतला, तो इतका मोठा होता की धूर बहुदा त्याच्या छातीच काय पण पायापर्यंत गेला असावा. तो खॉक, खॉक खॉक करत बराचवेळ खोकला. त्याच्या नाकातोंडातून पाणी आले. मी जोर जोरात हसून त्याच्याकडे तुच्छतेने पाहू लागलो.

“खासी आया मतलब इसने इन किया है बराबर से,  तुने नही किया था .. ”.. तर्जनी वर करत, जुगलने आपल्या शिष्याच्या बाजूने निकाल दिला. माझा पोपट झाला. सिगारेट प्यायच्या पहिल्याच परीक्षेचे ए ग्रेड पासिंग सर्टिफिकेट जुगलने दिल्यामुळे अली खुश झाला. त्याने सिगारेट सोडलीच नाही. तो पुन्हा झुरका घेणार, तितक्यात दरवाजावर गडबड ऐकू आली. कोणीतरी दरवाजा लोटत होते, पण कुंडी असल्यामुळे उघडत नव्हता. आम्ही गच्चीवर आल्याचे फक्त फातिमाला माहित होते. जुगलने रागाने अलीकडे बघितले. अली समजायचे काय ते समजला. उजव्या बोटांच्या कात्रीत स्टाईलमध्ये जेम्स बाँड ००७ सारखा सिगारेट धरून थोडा उघडलेला दरवाजा तो डाव्या हाताने बंद करू लागला. आता दरवाज्याच्या इकडून अली आणि पलीकडून कोणीतरी ढकलत होते. आम्हाला कळत नव्हते की फातिमाकडे इतका जोर कसा? कदाचित इराणी मुलींमध्ये खूप जोर असावा. शेवटी शेवटी तर अली सिगारेट तोंडात धरून दोन्ही हातांनी ढकलू लागला.
“उसको बोल ना घरपे जानेको” जुगल अलीवर बरसला.

उत्तरादाखल अलीने तोंडात सिगारेट असल्यामुळे मानेनेच हो म्हटले. पण बाहेरचे प्रेशर वाढले, अली दोन्ही हातांनी जोर काढून ढकलू लागला. पण त्याचा जोर कमी पडू लागला. मग धाडकन जोरात आवाज आला, अली आणि कुंडी दोन्ही उडाले.... अली मागच्या मागे फेकला गेला, पण आमच्या बाँड ००७ ने तोंडातील सिगारेट मात्र सोडली नाही. फातिमामध्ये केवढी ती शक्ती?, असा आम्ही विचारच करतच होतो, पण ती फातिमा नव्हती, ती शक्ती फातिमा आणि अलीचा जो दानव बाप होता त्याच्या  रुपात प्रकटली. आता आमच्या बाँड चा बँड वाजणार होता आणि आमचा ताशा, कारण अलीचा बाप, म्हणजे सव्वा सहा फुटी उंच आणि तगडा मोठा इराणी होता. गोरा गोरा लालबुंद. असे म्हणतात की माणसाची मनोवृत्ती त्याच्या चेहऱ्यात स्पष्ट दिसते, त्याप्रमाणे त्याचा चेहरा नेहमीच भयानक रागीट दिसायचा. फातिमाने, चुगलीचे काम अगदी चोख बजावले होते आणि मोठ्या भावाने घातलेल्या धपाट्याचे युक्तीने प्रत्युत्तर दिले. या राक्षसाने बहुदा दारावर जरा जोरातच लाथ मारली असावी त्यामुळेच अली आरपार उडाला. पाठीमागून मजा बघायला फातिमाही धावत आली. तिच्या चेहऱ्यावर कपटी हास्य होते.इथे आमच्या पडलेल्या ब्रेवो अलीच्या तोंडात सिगारेट अजून तशीच होती. ते पाहून बापाने कमरेचा बेल्ट काढला. पण मारायच्या आधीच अली जोरजोरात ओरडू लागला. त्यात त्याने सिगारेट माझ्याकडे फेकली. मान्य आहे मी चांगला क्रिकेटपटू होतो आणि त्यातही कॅच पकडण्यात माहीर, पण अंगावर पडलेली जळती सिगारेट मी पकडू शकलो नाही. शर्टाला भोक पाडून चटका मारून ती खाली पडली. जुगलने प्रसंगावधान राखून स्लीपरने ती विझवली.             

अलीच्या बापाने आता इराणी भाषेत शिवी हासडून अलीच्या कानाखाली जोरात जाळ काढला. एकाच फटक्यात गोऱ्यापान अलीचा कान लालेलाल दिसू लागला. आता तो इराणी शिव्या देत देत अलीला बेल्टने मारू लागला. अली जोर जोरात ओरडत रडत लोळत होता, कारण तमाशा झाला तर मार कमी असे त्याचे साधे गणित होते. ‘आपल्यासमोर आपल्या मित्राला कोणी मारत असेल तर गप्प बसणाऱ्यातले आम्ही नव्हतो, पण तो स्वतःच्या पालकाकडून जर मार खात असेल , तर थांबवण्याचा आपल्याला अधिकार नाही’ असे तत्वद्यान जुगलने मला दुसऱ्या दिवशी दिले.  अलीला यथेच्छ चोपल्यानंतर आता माझी आणि जुगलची पाळी होती. तसे आमच्या सर्वांच्या बापांकडे कोणाच्याही पोरांना धुवायचे भारतीय लायसन्स होते, पण ते लायसन्स बहुदा इराणमध्ये नसावे. अलीचे कुटुंब नुकतेच भारतात आले होते, त्याचा आम्हाला बेनिफिट मिळाला.  

जुगलकडे दुर्लक्ष करून माझी, बखोट पकडून अलीच्या बाबांनी मला माझ्या घरी आणले. बेल वाजवली, जुगल खरा मित्र होता कारण त्याला पळायला फुल चान्स होता पण भिडू शेवट पर्यंत आमच्या सुखदुखात सहभागी राहिला.
बऱ्याssच वेळाने आजीने मेन दरवाजा उघडला. जाळीच्या दरवाज्यातून तिला फक्त माझी मुंडी दिसली.
“सारखं, सारखं, खय जातंस नी येतंस...... हाँ....?” म्हणून माझ्यावर डाफरली आणि आत जाऊ लागली.

अग, आजी, जाळीचा दरवाजा उघड” मी कसाबसा बोललो. मुंबईत घराला दोन दरवाजे असतात, हे ती नेहमी विसरत असे. वैतागून तिने दरवाजा पूर्ण उघडला.
अलीच्या बाबाने पोलीस आरोपीला धरतात तशी माझी कॉलर धरली होती त्यामुळे मी जमिनीपासून अर्धा फुट उंच चालत होतो. त्या कसायाने माझी मुंडी धरून मला घरात आणले. आता अली आणि जुगल मागे उभे होते आणि माझ्या आजीच्या समोर मला उभे करण्यात आले. पंख पकडलेल्या कोबडीसारखा मी फडफडत होतो आणि मान सोडवून घायचा प्रयत्न करत होतो. पण पकड मजबूत असल्यामुळे ती सुटणे शक्य नव्हते. आमची आजी मात्र दुपारची झोपमोड झाली म्हणून त्रासली होती.  
लांबची नातेवाईक असलेल्या या आज्जीला, मला सांभाळायला बाबांनी मागच्याच महिन्यात मालवण वरून इम्पोर्ट केले होते. घरवाल्यांच्या मते, आजकाल मी खूपच हाताबाहेर गेलो होतो, त्यामुळे खरे तर मला सुधरवायच्या स्पेशल डेपुटेशनवर या सेनापतीची नेमणूक झाली होती. आजी आयुष्यात पहिल्यांदाच मुंबईला आली होती, त्यामुळे एकंदर वातावरणाशी, माणसांशी आणि माझ्याशीपण हळूहळू अॅडजस्ट होत होती. नऊवारीतील ही म्हातारी तीस चाळीस अंशात वाकलेली असली तरी कडक होती, आवाज बावनकशी खणखणीत होता. वर आमच्या अक्ख्या गावात, मोठ्यांमध्ये ‘भांडकुदळ’ आणि लहानांमध्ये ‘मारकुटी म्हातारी’ म्हणूनच फेमस होती. तिथे भांडल्याशिवाय तिचा दिवस जात नसे. गावाला तोंडी लागायला रोज कोणी ना कोणी तुल्यबळ प्रतिस्पर्धी सापडायचा. पण मुंबईत आल्यावर खरे तर तिचा प्रॉब्लेम झाला होता, कारण तिला भाषाच कळायची नाही. तशी दुधवाल्या भैयाशी आणि बोहाराणीशी भांडून तिने थोडीफार हौस पूर्ण करून घेतली होती. पण भांडायला तेव्हाच मजा येते जेव्हा दोन्ही पार्ट्या तुल्यबळ असतात, दोघांना भरपूर शिव्या येत असतात आणि वेळही असतो. त्यावर दुसरा आपल्याला किती घाणेरड्या शिव्या देतोय, हे कळले तरच मस्त चेव येतो आणि भांडण रंगते. भैयाशी आणि बोहारणीशी तिने भांडण केले पण रंगले नव्हते. कारण भाषेमुळे मजा नव्हती, मॅच एकतर्फी झाली होती. 

इथे देश बदली झाल्यामुळे अलीच्या बाबांची भाषेची बोंब होती. ते अत्यंत मोडक्या हिंदीत आणि तोडक्या उच्चारात बोलत आणि जिल्हा बदली झाल्यामुळे आमच्या आजीचीही भाषेची बोंब होती तिलाही मालवणी शिवाय भाषाच येत नव्हती..   
वो ...पाह्पा किदर, किदर पाह्पा ...बुलाना ? आतल्या बंद बेडरूमच्या खोलीत पहात त्यांनी आज्जीला जोरात विचारले. आजीला काही कळलेच नाही.
माझी बखोट आणखी आवळून पकडून “ माझ्याकडे बोट दाखवत, इसका पाह्पा किदर?”....पुन्हा ओरडून अलीच्या बाबांनी आत पहात विचारले. मोठ्या इराणीला पाह्पा म्हणजे पापा बोलायचे होते आणि ते माझ्या वडलांविषयी विचारत होते. बाबा अजून यायचे होते, पण बेडरूमचा बंद दरवाजा पाहून त्यांना वाटले की माझे बाबा घरीच आहेत. त्यांची ही भाषा आजीला कळेल तर शपथ. नेहमीचा चेहरा नसल्यामुळे आणि चष्माही नसल्यामुळे आजीने त्यांना ओळखलेच नाही. एखाद्या विचित्र प्राण्याकडे पाहतात तशी ती त्या पठाणी घातलेल्या उंच माणसाकडे वरपासून खालपर्यंत पहात होती. त्यांनी आपल्या हातात काहीतरी पकडले आहे आणि ती माझी मुंडी आहे हे लक्षात यायला तिला थोडा वेळ लागला. हा मनुष्य आपल्या घरात आतपर्यंत बघतोय हेही तिला आवडले नसावे. आपल्या घरात येऊन  आपल्यापेक्षा मोठ्या आवाजात बोलणाऱ्या व्यक्ती तर तिला अजिबात पसंत नव्हत्या. वर आजीचा मी एकमेव नातू होतो आणि ती माझी बॉडीगार्डही होती. त्यामुळे माझी बखोट एका अनोळखी माणसाने धरलीय हे तिला जेव्हा कन्फर्म झाले तेव्हा ती भडकली. तिने पदर खोचला.

“रांडीच्या, सोड ह्याका...., बाप्साचा माल हाय काय तुझ्या..xxxxx.?”.. म्हणून अलीच्या बापाला त्याच्या बापावरून शिव्या देत तिने मला हिसडा देवून सोडवून घेतले. अलीचा बाबा अचंबित झाला. हे तर पोलिसानेच फिर्यादीला धमकावून आरोपीला सोडवल्यासारखे झाले होते. काही का असेना, आजीच्या रुपात देवाने माझ्या बचावासाठी माणूस पाठवला होता. मी पटकन त्या शूर आणि धाडसी स्त्री च्या मागे जाऊन एकदम सेफ उभा राहिलो. आतापर्यंत मोठ्या इराण्याने माझी मुंडी पकडल्यामुळे शर्ट चुरगळला होता आणि मान मुरगळली होती त्यामुळे दुखत होती, पण चड्डी पिवळी व्हायची बाकी होती. माझ्याजागी बिट्टू असता तर नक्की तेही झाले असते. मी मान डावी, उजवीकडे हलवून सगळे ठीकठाक आहे ना ते पाहून घेतले. परिस्थिती पालटली होती, मला सोडवताना तिचा आवेश इतका भयानक होता की माझी मुंडी पकडणाऱ्या या गनिमाची ती मुंडीच मुरगळून टाकेल की काय अशी स्थिती निर्माण झाली. बाय द वे, ह्या डायनासोरचा मार खायची शक्ती फक्त अलीतच होती, ते आमच्यासारख्या आंडूपांडूचे  काम नव्हतेच याची मला जाणीव झाली. आता मला अलीच्या बापाला घाबरायचे काहीच कारण नव्हते. ‘नाहीतरी मालवणी माणूस कधीच कोणाच्या बापालाही घाबरत नाही’. सिनिअर इराणीच आरोपी झाला होता, आणि त्याने मला आता हात जरी लावयचा प्रयत्न केला असता तर आमच्या आजीने नुसत्या शब्दशिव्यांनी त्याला फाडून खाल्ला असता. ‘हाही गुण आम्हा मालवाण्यांमध्ये जन्मजात असतो’. आजी माझ्यासाठी रणरागिणी झाली होती.

“ये शिगलेट... इसका पाह्पा, पाह्पा को बटाना”.. म्हणून माझ्याकडे बोट दाखवून, त्यांनी फु फु करून खोटा धूर सोडत सिगारेट प्यायची नक्कल करून दाखवली. तिला काहीच कळेना.

“शिगलेट... पाह्पा.. बटाना, बटाना” अलीचा बाप रिटेक वर रिटेक मारत होता. चार पाच वेळा सेम सेम एपिसोड पाहून शेवटी ती कंटाळली, हा मनुष्य थांबतच नाही आणि जातही नाही म्हटले तर आजीचे आता डोकेच फिरले. नाहीतरी इतक्या दिवसांची भडास तिला काढायचीच होती.
“खयचा पापा? ना... कसला काय ता.. बटाना.., बटाना... लावलाय हाँ...आ? ये xxxxx, माय..xxxxx, जातो का आता, का काढू पायताsssन हाँ” दात ओठ खात अलीच्या बापावर खेकसून आजीने गाडी पहिल्या गियर मध्ये टाकली. तिने काय शिव्या दिल्या त्या मी येथे खरंच सांगू शकत नाही (इच्छुकांनी, मालवणात एखाद्या जुन्या आजीच्या घरी जाऊन तिच्या परसदारातील पडलेला फक्त एक आंबा उचलून पाहावा)
अलीच्या बाबांचाच चेहरा आता घाबरून केविलवाणा झाला. आमच्या अठ्ठ्यात्तर वर्षांच्या, चाळीस किलोच्या, साडेचार फुट आजीने साधारतः चाळीशीतल्या, सव्वाशे किलोच्या, सव्वा सहा फुट इराण्याला चित करून टाकले होते. त्यांनी प्रश्नार्थक मुद्रेने आधी वर मग खाली नंतर आमच्याकडे पाहिले.आमच्या आजीने आमच्यासमोर त्यांचा खुल्ला अपमान करून टाकला होता. आम्हाला तिघांना मनातल्या मनात गुदगुल्या होत होत्या. जुगलच्या गुदगुल्या ख्या ख्या करून तोंडावाटे बाहेरही आल्या. त्यावर अलीच्या बापाने त्याला सॉलिड खुन्नस दिला. पुन्हा आम्ही सर्व चिडीचूप. काही वेळ शांततेत गेला. आता अलीलाच त्यांची दया आली असावी किंवा मदत केली तर उरलेला मार कटाप व्हायची अंधुकशी शक्यता वाटली असावी आणि कसेही झाले तरी तो त्यांचा मुलगा होता.

“ये माझा पापा हाये...पपा, पपा,....मेरा बाबा ..बाssबा”  छातीवर तळहात ठोकत अली ने रागावलेल्या आजीशी आपल्या बापाची ओळख करून दिली. आजीला थोडे काहीतरी कळले असावे, कारण आजीच्या कपाळावरील आठ्या किंचित कमी झाल्या.
“तुझा, बापूस असा...हा .., ह्योsss?“... तिने आधी अलीकडे मग बापाकडे अंगुलीनिर्देश करत विचारले. मग अलीकडे वरपासून खालपर्यंत पाहिले, बापाकडे पण वर पासून खालपर्यंत पाहिले, दोघांनीही पठाणी घातला होता, दोघेही गोरे गोरे पान होते. सध्याला अली मार खाऊन आणि बाबा रागाने लाल झाला होता. त्यामुळे त्वचेचीही  रंगसंगतीही जुळत होती. या सर्व सारखेपणामुळे तिची थोडीशी शंका मिटली असावी.. अलीच्या बाबांच्या चेहऱ्यावर मात्र प्रश्नचिन्ह कायम होते.

“हा येच इसका बापू है एटले...बापूस,... बापूस्सsss...” म्हणून सुस्कारा सोडत जुगलनेही अलीकडे बोट दाखवत मोठ्या इराण्याला मदत केली, त्याची बाजू घेतली. आता ती आणखी शांत झाली आणि मदत केल्यामुळे मोठ्या इराण्याचे जुगलबद्दल किंचितसे अनुकूल मत झाले.

आता तरी ही म्हातारी ऐकेल, असे त्यांना वाटले आणि माझे बाबा नसले तरी तिच्यापर्यंत तरी आमचे धंदे पोचवण्याची जबाबदारी पुन्हा नव्या जोमाने त्यांनी खांद्यावर घेतली. त्यानंतर, बराच वेळ अलीच्या बाबांनी तिला सांगायचा प्रयत्न केला. वारंवार सिगारेट पिण्याची अॅक्शन वगैरे पण करून दाखवली. पण या माणसाला काय म्हणायचे आहे हे शेवटपर्यंत तिला काssही कळले नाही. तिचा पेशंस संपत आला. थोड्यावेळाने तिला अलीच्या बाबांचे हातवारे वेडगळ माणसासारखे वाटू लागले.

“ह्याचा डोका ठिकानावर हाय काय? खुळो का यडो असा हा आं.?”.. अलीच्या बाबांकडे बोट दाखवत तिने मला जोरात विचारले.
“खुळो बोले तो?... पागल बोली क्या,.. तेरी आज्जी? और यडो बोले तो भी पागलीच ना रे?” मी लांब असल्यामुळे जुगलने मला जोरात ओरडून प्रश्न केला. तो अजून दरवाजातच होता. मी मानेनेच हो म्हणालो. अलीच्या बापाला मालवणी कळले नसले तरी जुगलचे भाषांतर बरोब्बर कळले. अलीचा बाबा साफ गप्पगार झाला. जुगल आणि मलाही हसू आवरले नाही. “ये पागल बोली आज्जी” आम्ही खळाळून हसून घेतले.अलीच्या बापाचा अपमानावर अपमान होत होता. आणि काहीही सांगता न आल्यामुळे मोठा इराणी आता निराश झाला, डोक्याला हात लावायची वेळ आली. आज्जीला फक्त ही मुले काहीतरी पित होती एवढेच कळले होते.

तरीही, अलीचा बाबा जात नाही म्हटल्यावर “ह्यांका चाय.. चपाती खायची काय ?” सारखे “पाह्पा, पाह्पा” करणाऱ्या अलीच्या बापाकडे बघून तिने विचारले. शेजारची दोन वर्षाची सोनू चपातीला पापा म्हणते हे तिला माहित होते. मीच काय पण अख्या मालवणात बापाला बाबाच म्हणतात, त्यामुळे बाबा म्हणजे पापा या समानार्थी इंग्रजी शब्दाची तिच्या शब्दकोशात अजून भर पडली नव्हती. मी काहीच बोललो नाही. पण जुगलने संधीचे सोने केले. प्रसंगावधान राखून मराठीत मोठ्याने
‘बराबर.., आपको इसका पापा चाहिये ना?’ असे अलीच्या बापाला विचारले.
अलीच्या बापानेही “इसका, पाह्पा, पाह्पा चाहिये ” करत पुन्हा हो म्हणून मान डोलावली. तरी बरे आमचा पाह्पा अजून घरी आला नव्हताच. नाहीतर माझेही काही खरे नव्हते. आता आजीने काहीतरी निश्चयाने ठरवले, ती निघाली. संपूर्ण सायलेन्स पसरला. थोड्याच वेळात आजी एका ताटात नुसती चपाती आणि पाणी घेऊन आली. ते ताट तिने अलीच्या बापाकडे दिले. तो ताटाकडे आ वासून पहात राहिला

“हा घे तुझा पापा, एकच पापा उरला आसा, नी चाय ठीवतेssय..” म्हणून कपाळाला हात लावून परत हळूहळू स्वयंपाक खोलीत गेली. आता कमीत कमी पंधरा वीस मिनिटांची तरी काशी होती. तेवढाच आम्हाला सुटकेचा विचार करायला वेळ मिळणार होता. पण तशी पाळीच आली नाही. कारण, पाच, दहा मिनिटं वाट पाहून अलीचे बाबाच वैतागून धुसफुसत निघाले. ते दरवाजातून वेगाने घराबाहेर पडले. आम्हाला हायसे वाटले. अली तरीही तिथेच. चार पावले चालल्यावर त्यांच्या लक्षात आले की अली त्यांच्याबरोबर नाही आहे. ते मागे फिरतच होते,  

“ये साला बचा, मै मरेगा” माझ्याकडे पाहून जुगल म्हणाला.
“अब्बा तेरे घर जायेंगेइच नही, कलीच तो तेरी और मेरी मा का झगडा हुवा है, हम लोग मटन कचरा बाहर रखते है करके, तुम लोग जैन हो ना” आणि डोळ्यात पाणी न आणता अली बापाने परत बडवायच्या आधीच  जोरजोरात केकाटू लागला.
बेशक त्या दिवशी तरी आम्ही दोघेही वाचलो होतो.  


                                                         :-) :-) :-) आनंद वामनसे